युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमधील वाद अजून वाढतच चालला आहे. समय आणि रणवीरवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना पोलीश चौकशीसाठीही बोलवण्यात आले आहेत. सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

या शोमध्ये रणवीरने पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे हा वाद पेटला. रणवीरने त्याबद्दल सर्वांची माफीही मागितली मात्र त्यानंतरही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून एका अभिनेत्याने रणवीरला चांगलंच सुनावलं आहे. हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे, फक्त सॉरी म्हणून हे चालणार नाही. असं म्हणत या अभिनेत्याने रणवीरला फटकारलं आहे.

शेखर सुमन यांनी या कलाकारांवर टीका केली आहे. टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी म्हटंलं आहे की, “हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे, घाणेरडेपणाचे स्वातंत्र्य आहे, यामागील लोकांना सावध केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे. फक्त सॉरी म्हणून तुम्ही सुटू शकत नाही.”

शेखर सुमन पुढे म्हणाले, “हे समाजातील सर्वात वाईट लोक आहेत, जे आपल्या देशाच्या नैतिक रचनेचा नाश करत आहेत. त्यांना वाटते की ते खूप छान आहेत, पण ते काहीसे विकृत आणि बुद्धिहीन मूर्खांसारखेच आहेत. जर तुम्ही त्याला शो म्हणत असाल तर ते ताबडतोब बॅन केलं पाहिजे” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.