पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’ या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ३९ चारचाकी वाहने आणि ‘कॉप-२४ पेट्रोलिंग बाईक’ पथकाचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
यावेळी, शहरात गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. त्या घटनांचा उलगडा करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींना शिक्षा देखील होत आहे. कोणताही अपघात झाल्यानंतर त्याला पोलिसांकडून मिळणारा प्रतिसाद कमीत कमी असावा. पोलिसांचा सतत रस्त्यावर वावर असावा व येथील कायदा व सुव्यवस्था उत्तम ठेवण्याचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरिक हवाई वाहतूक व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास मंत्री माधुरी मिसाळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
फडणवीस म्हणाले, पोलिसांना आवश्यक अद्ययावत कार्यालय, तंत्रज्ञान, वाहन, सीसीटीव्ही अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या कुटुंब कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या योजना राबविण्यात येत असून आरोग्य सुविधा व घरांचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. पोलिसांना चांगल्या वातारणात जगता आले तर ते चांगले काम करू शकतील. पोलिस तपासात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील सर्वांत चांगला सायबर प्लॅटफॉर्म राज्य सरकारने तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले ?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्य शासन हे सातत्याने पोलिसांच्या मागे उभे आहे. पुणेकरांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी. पोलिसांना कोणत्याही पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही. एकदा चोरीला गेलेले सोने सापडून दिले आहे. यापुढे आपले सोने चोरीला जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
तरंगमध्ये गायक व संगीतकार अजय-अतुल यांच्या संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांनी आनंद घेतला. गेल्या वर्षभरात उत्कृष्ठ कामगिरी करणार्या पोलिसांचा यावेळी फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शहर पोलिस दलाच्या कॉप 24 या उपक्रमाचे उद्घाटन यावेळी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.