‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लगीनघाई सुरू होती. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा कोकणात थाटामाटात पार पडला आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता सहभागी झाली होती. शोमध्ये असतानाच तिने लवकरच लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. गेल्यावर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकिताने कुणालबरोबरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर ‘कोकण हार्टेड गर्ल’चे सगळे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांच्या लाडक्या अंकिताने आता वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

अंकिताचा विवाहसोहळा राजेशाही थाटात व पारंपरिक पद्धतीने कोकणात पार पडल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. अंकिताने लग्नात पिवळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, गळ्यात मोठा नेकलेस असा लूक ‘कोकण हार्टेड गर्ल’ने विवाहसोहळ्यात केला होता. तर, तिचा पती कुणाल भगतने सुद्धा लग्नात मराठमोळा लूक केला होता.

अंकिताने लग्नाचे फोटो शेअर करत याला “वालावलकरांचो थोरलो जावई” ( वालावलकरांचा सर्वात मोठा जावई ) असं कॅप्शन दिलं आहे. ती पुढे लिहिते, “कुणाल तुला माझ्यासारखी मुलगी बायको म्हणून मिळाली, यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन! तू लकी आहेस…”

दरम्यान, अंकिताचा नवरा कुणाल भगत हा मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखला जातो. ‘येक नंबर’ या सिनेमासाठी कुणालने संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांना देखील त्याने संगीत दिलं आहे. सध्या संपूर्ण मनोरंजन विश्वातून अंकिता व कुणाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *