‘छावा’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. मोठ्या पडद्यावर ही कथा पाहून प्रेक्षक भावुक झाले आहेत.
विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केली होती. त्यानंतर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली. आता ‘छावा’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. आधीच्या दोन्ही दिवसांच्या तुलनेत रविवारी चित्रपटाने जास्त कलेक्शन केले आहे. चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे, तसेच कमाईतही सातत्याने वाढ होत आहे.
‘छावा’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवारी भारतात पहिल्याच दिवशी ३३.१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये वाढ झाली. शनिवारी ‘छावा’ने तब्बल ३९.३ कोटी रुपये कमावले. रिलीजनंतरच्या पहिल्या रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४८.५ कोटी रुपये कमावले, अशी माहिती इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे. चित्रपटाचे तीन दिवसांचे भारतातील कलेक्शन ११६.५ कोटी रुपये झाले आहे. तिसऱ्या दिवसाची आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. ‘छावा’च्या जगभरातील कमाईचे आकडे अद्याप समोर आलेले नाही.
‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, तर समीक्षकही या चित्रपटाचं खूप कौतुक करत आहेत. विकी कौशलने त्याच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट अभिनय या चित्रपटात केला आहे, असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. चित्रपटात विकी कौशलबरोबरच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहित पाठक हे कलाकार आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाची कमाई पाहता लवकरच निर्मिती खर्च वसूल होईल असं दिसत आहे.