राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. अजित पवारांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम दौरे रद्द झाले असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी काल (रविवारी, ता-16) नाशिकमध्ये आमदार सरोज आहेर यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खराब झाली होती.

काल (रविवारी, ता-16) नाशिकमध्ये भाषणात अजित पवार यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले, त्यानंतर ते पुण्याला आले होते. मात्र, रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना बरं वाटत नसल्यामुळं त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. यामुळे पुण्यातील औंध येथील आयटीआय मधील प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहू शकणार नाहीत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घशाचा संसर्ग झाला असल्याची माहिती आहे. रविवारी दुपारी त्रास जाणवू लागल्यानंतर अजित पवार नाशिकमधील उर्वरित कार्यक्रम रद्द करून पुण्याला रवाना झाले होते. नाशिकमध्ये उन्हाचा त्रास झाल्याने आणि ताप असल्यामुळे अजित पवारांनी पदाधिकारी बैठका रद्द केल्या होत्या, त्यानंतर ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. आज देखील त्रास होतं असल्यामुळे अजित पवारांकडून दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकमध्ये भाषणावेळी अजित पवारांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. आताच आपण दोन गोळ्या घेतल्या आहेत, तरीही मला बरं वाटत नाही. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

बीड जिल्ह्यात सध्या मस्साजोग प्रकरणावरून आणि एकमेकांवर आरोप करणारे नेते भेटल्याने राजकीय वर्तुळातून सध्या मोठ्या प्रमाणावर हल्लाबोत होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल (रविवारी,16) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जुन्नर येथे जाऊन भेट घेतली. या भेटीची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. जुन्नर येथील सत्र न्यायालयाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले होते. तेथे संदीप क्षीरसागर आणि अजित पवारांची भेट झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *