राजकीय मतभेदातून एकमेकांपासून वेगळे झालेल्या ठाकरे बंधुंना कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्र येण्याची साद घातलीये. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकमेकांपासून दूर गेल्याला आता बराच काळ लोटलाय. वेगळी भूमिका, वेगळी राजकीय मतं यामुळे एकत्र येण्याला फारसा वाव दिसत नाही. मात्र सामान्य कार्यकर्त्यांची ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याची आस अजूनही शमली नाही. कारण शिवसेनाभवनासमोर ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रिकरणाच्या चर्चा रंगल्यात.

आपल्या राजकरण पाहण्याच्या वेगळ्या परिप्रेक्ष्यातून राज ठाकरेंनी 2006 साली शिवसेनेतून बाजूला होत आपली वेगळी चूल मांडली. या घटनेला जवळपास 20 वर्ण होत आली तरी कार्यकर्त्यांना आजही दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी आशा आहे. हिच आशा पुन्हा समोर आली, शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरने. या बॅनरमधून कार्यकर्त्यांनी ठाकरे भावांनी राज्यासाठी एकत्र याव असं म्हटलंय.

मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या या भावना असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हंटलय. तर याआधी मनसेने अनेकदा प्रयत्न केले आता मोठ्या भावाने पुढाकार घ्यायला हवा, असं मनसैनिकांनी म्हटंलय.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत. अनेकदा उघड उघड दोघे एकमेकांवर टीका करताना महाराष्ट्राने पाहिलंय. असं असलं तरी कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्रही पहायाला मिळालंय. राज ठाकरेंनी मनसेच्या रूपाने उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली असली तरी आजही त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी विधानं सामान्यांपासून, कार्यकर्ते, सोबतच नेत्यांनीही केलीयेत. आता पुन्हा बॅनरमुळे ठाकरेंच्या एकत्रिकरणाची चर्चा रंगलीये. आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या या भावनांचा विचार होतो का. राज आणि उद्धव यांचे मनोमिलन होते का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *