संत निरंकारी मिशनच्या सेवेची भावना आणि मानव कल्याण संकल्पना साकार करण्यासाठी ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ पाणी, स्वच्छ मन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे भव्य उद्घाटन रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी निरंकारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज व आदरणीय राजपिता रमित जी यांच्या पवित्र उपस्थितीत यमुना नदीच्या छठ घाट, आयटीओ, दिल्ली येथे करण्यात येणार आहे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ पाणी आणि निरोगी पर्यावरणाचे वरदान मिळावे यासाठी जलसंधारण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

संत निरंकारी मिशनने, बाबा हरदेव सिंह जी महाराजांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने २०२३ मध्ये ‘प्रोजेक्ट अमृत’ सुरू केला. या दैवी उपक्रमाचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता सुनिश्चित करणे नाही तर जलसंवर्धन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याची मानसिकता विकसित करणे हा आहे. नद्या, तलाव,विहिरी आणि झरे यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी समर्पित असलेल्या या महामोहिमेला पहिल्या दोन टप्प्यात अभूतपूर्व यश मिळाले. याच प्रेरणेने, या वर्षी तिसरा टप्पा अधिक व्यापक, प्रभावी आणि दुरोगामी दृष्टीकोनातून पुढे नेण्यात आला आहे, जेणेकरून ही मोहीम विस्तारित राहावी आणि समाजात जागृती, सेवा आणि समर्पणाची तीव्र लाट निर्माण होईल.

संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, ही मोहीम देशभरातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९०० हून अधिक शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केली जाईल. या महामोहिमेचे हे अभूतपूर्व प्रमाण या मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप देईल, ज्यामुळे जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल.

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कर्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट, कात्रज तलाव, आळंदी-देहू येथील इंद्रायणी नदी घाट,मोरया गोसावी मंदिराचा पवना नदी घाट आदी प्रमुख ठिकाणे असतील, अशी माहिती मिशनचे पुणे जिल्हा प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली.

पुण्यामध्ये संत निरंकारी मिशनचे सुमारे ६ हजार हुन अधिक समर्पित स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार असून जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजार आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता आजच्या तरुण पिढीला समाज कल्याणासाठी सकारात्मक कार्य करण्यास प्रेरित करणारे एक सशक्त माध्यम बनेल.

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज देखील आपल्याला या पृथ्वीला अधिक सुंदर रूपात सोडण्याची प्रेरणा देतात. हे अभियान त्या संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला जागृती, सेवा आणि समर्पणाच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *