kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील दोन कलमे वगळण्याची मेहरबानी सीआयडीने का दाखवली आहे; खा. सुप्रिया सुळेंनी प्रश्न विचारत व्यक्त केला संताप

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने नुकतेच न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. मात्र सीआयडीने टोळीचा म्होरक्या म्हणून सुदर्शन घुले याचा उल्लेख केल्याने वाल्मीक कराडला वाचवण्याचा हा प्लॅन आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. अशातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील दोन कलमे वगळण्याची मेहरबानी सीआयडीने का दाखवली आहे, असा प्रश्न उपस्थित करत आपला संताप व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, “स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शासनाकडे न्याय मागणाऱ्या देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंची दखल शासन घेत नाही, असे दिसत आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावरील खंडणीच्या गुन्ह्याबाबतची दोन कलमे सीआयडीने वगळली. ही अतिशय संतापजनक बाब आहे. या संपूर्ण घटनाक्रमातील खंडणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याबाबतचा गुन्हा वगळण्याची मेहेरबानी सीआयडीने का केली याचे उत्तर शासनाने देशमुख कुटुंबियांना देणे गरजेचे आहे,” अशी भूमिका खासदार सुळे यांनी मांडली आहे.