जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे. तसेच, नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे.
लोकशाहीत आमचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात बेड्या घालून प्रवेश केला. याबाबतची बाईट पाहिली परंतु हाच मिडिया रोज विविध विषयांवर ठाणे येथे बंगल्यावर असो किंवा पक्ष कार्यालयात असो सातत्याने या सरकारच्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड ज्या – ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात या सर्वांना माध्यमे कव्हरेज देतात मग आवाज कसा दाबला जातो असा सवालही आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.
लोकशाहीत विरोधकांनी आपली सकारात्मक भूमिका मांडली पाहिजे. आणि नेहमी जितेंद्र आव्हाड मांडत असतात. पण आज मी काहीतरी स्टंट केला पाहिजे, काहीतरी मी वेगळा आहे हे दाखवले पाहिजे म्हणून हा खटाटोप होता मात्र दुर्दैव असे की, ही स्टंटबाजी करताना त्यांच्या पक्षाचा एक आमदारही सोबत नव्हता असा खोचक टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.
अमेरिकेहून भारतीय नागरिक पुन्हा भारतात पाठवले गेले. त्यांच्या हातात बेड्या होत्या. खरंतर देशाचे परराष्ट्र धोरण हे ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, ना विधानपरिषदेत ठरते तर ते ठरते देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत याची आठवण करून देताना आनंद परांजपे यांनी अमेरिकेतून आलेल्या भारतीयांना परत पाठवण्यात आले. याचा निषेध करायचा असेल तर लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन दुसर्या सत्रात सुरू होईल तेव्हा खासदारांनी बेड्या घालून निषेध नोंदवावा असेही आनंद परांजपे म्हणाले.