पुण्यातील स्वारगटे बस स्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याच्याबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा पोलिसी गणवेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दत्तात्रय गाडे हा स्वारगेट आणि आजुबाजूच्या परिसरात पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा, अशी चर्चा होती. मात्र, आता दत्तात्रय गाडे याचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर आला आहे. दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलीसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमधे आढळलेला हा फोटो आहे. आपण पोलीस आहे अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, असे सांगत दत्ता गाडे अनेक मुलींशी ओळख वाढवायचा . दत्ता गाडे याने परिधान केलेला हा पोलिसाचा गणवेश नक्की कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याचा होता की त्याने तो शिवून घेतला होता, याचा तपास होण्याची गरज आहे. अशाप्रकारे गणवेश घालून एक आरोपी जर गुन्हे करत होता तर पोलीसांच्या ही बाब लक्षात आली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात फिरायचा. कधी पोलीस अधिकारी, कधी बस कंडक्टर असल्याचे भासवून त्यांनी अनेकांना लुटले होते. त्याच्यावर वेगवेगळ्या बस स्टँडच्या परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये सहा गुन्ह्यांची नोंद आहे. दत्तात्रय गाडे इतके दिवस पोलिसी गणवेशात फिरत असेल तर ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच यावरुन दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार होता, यावर शिक्कामोर्तबही झाले आहे.

अंदाजानुसार, दत्तात्रय गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडवर वारंवार जात असावा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. 26 वर्षीय तरुणीवरील बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलीस असल्याचे भासवायचा.

दत्तात्रय गाडे याने 25 फेब्रुवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट स्थानकातील तरुणीला फसवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते. ही तरुणी बसमध्ये शिरल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दरवाजा लावून घेतला आणि तरुणीला धमकावले. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने तरुणीवर दोनवेळा बलात्कार केला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे हा शिरुर तालुक्यातील आपल्या गुनाट या गावी पळून गेला होता. गावी ऊसाच्या फडात तो लपून बसला होता. पुणे पोलिसांनी 100 जणांचा फौजफाटा, ड्रोन कॅमेरा आणि डॉग स्क्वॉडच्या साहाय्याने शोधमोहीम राबवत 27 फेब्रुवारीला रात्री दत्तात्रय गाडे याला पकडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *