मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, इथली माती, हवा, पाणी, संस्कृती आणि भाषा मराठी आहे. या भूमीत येऊन पोट भरायचं, पाय रोवायचे, धंदा-पाणी करायचं, मोठं व्हायचं आणि वर इथल्या भाषेकडे तुच्छतेने पाहायचं? महाराष्ट्राच्या मातीवर उगवून तिच्याच संस्कृतीला हरामखोरीने झिडकारणाऱ्या प्रवृत्तीना आता ठेचल्याशिवाय राहणार नाही!राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी इशारा दिला आहे.
आणखी काय म्हणाले ॲड. अमोल मातेले ?
भैय्याजी जोशी यांनी “मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही” असं विधान करून मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या भूमीत घुसला असाल, तर इथल्या मातीत मिसळलंच पाहिजे! नाहीतर महाराष्ट्र कधी काय करेल हे सांगता येणार नाही! आमची शांतता ही आमची कमजोरी समजू नका. इतिहास गवाळांसाठी नाही, मराठ्यांनी स्वाभिमानावर घाव घालणाऱ्यांना कसा धडा शिकवला याची जिवंत साक्ष आहे!
सहिष्णुतेच्या नावाखाली मराठी माणसाला गिळायला तुम्ही शिकला असाल, पण अजून आम्ही गप्प बसलेलो नाही. महाराष्ट्र म्हणजे कुणाच्या बापाचा बंगला नाही, की कोणी उठावं आणि आपली मनमर्जी लादावी! मुंबईत आलात, इथली हवा खाल्ली, इथला पाऊस अंगावर घेतला, इथल्या जमिनीवर उभं राहिलात, तर मराठी बोलावी लागेलच! नाहीतर मग तुमची गाठ महाराष्ट्राच्या मातीशी आहे!
आम्ही कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या अंगावर आलात तर भल्याभल्यांना बडवायचं आमच्या रक्तात आहे! इतिहास डोळ्यासमोर ठेवा, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव, शिवरायांच्या महाराष्ट्रात जर कुणी मातीत राहून मातीतलीच भाषा नाकारली, तर त्याच्या मुसक्या आवळायलाही आम्ही मागे हटणार नाही.
उगीच गोडगोड बोलून फोडाफोडीचे डाव टाकू नका. महाराष्ट्रात राहायचं, कमवायचं, मोठं व्हायचं? मग मराठी शिकायचीच लागेल! नाहीतर मग महाराष्ट्रात पाय रोवणं कठीण होईल!
मुंबईत राहायचं, इथून कमवायचं, मोठं व्हायचं, पण इथल्या माणसाशी दोन शब्द मराठीत बोलायला लाज वाटते? मग लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीचा स्वभाव मऊ असला तरी वेळ आल्यावर तो दगड होतो आणि कुणाच्या डोक्यात फोडायचा, हे आम्ही ठरवतो.आसे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
मराठी शिकलीच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात जगणं कठीण होईल. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, पण आमच्या मुळावर उठलात, तर मातीत पुरल्याशिवाय राहणार नाही! मराठीला कमी लेखणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाईल, हे ठाम आहे!बोललं, ते ठरलं!
जय महाराष्ट्र!