काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस पडल्याचं दिसून येत असून अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगर बंदची हाक दिली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की पुढच्या १० पिढ्यांना ते आठवून त्यांचा थरकाप उडाला पाहिजे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.
राज ठाकरेंची पोस्ट काय?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली… ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
Leave a Reply