०१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी जुलै २०१९ पासून पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्या पुढील आठवड्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारने २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सीतारामन यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये वित्त विभागाची जबाबदारी सोपवली. इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. इंदिरा गांधी यांनी १९७० – ७१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी बजेट दस्तऐवजांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक ब्रीफकेस काढून टाकल्या आणि पहिलं डिजीटल बजेट सादर केलं होतं.

निर्मला सीतारामन ०१ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करून मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांसारख्या माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्डला मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याऱ्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची त्या बरोबरी करणार आहे. अर्थमंत्री म्हणून, देसाई यांनी १९५९ – १९६४ दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.