देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना यापुढे स्वच्छता सैनिक म्हटले गेले पाहिजे. आज स्वच्छता सैनिकांच्या मागण्यांबाबत मनपा प्रशासन व सरकार आडमुठी भूमिका घेते. त्यामुळे आगामी काळात जोरदारपणे संघटित होऊन तीव्र आंदोलन करण्याचा आजच निर्धार करा, असे आवाहन अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ सुधाकर पणीकर यांनी केले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात सफाई कामगार व त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, त्या वेळी डॉ सुधाकर पणीकर बोलत होते. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगीता तिवारी होत्या.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे, गणेश भोसले, विकास कुचेकर, अॅड. रशिद सिद्दिकी, गुलाब चव्हाण, मनोहर परमार, प्रमोद कोटियाना,चंद्रकांत चव्हाण, कैलास बिडलान, वनिता घोरपडे, रवी भिंगानिया, परवीन लालबिगे, गणेश लालबिगे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट सफाई कामगार, तसेच कामगार नेत्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,तसेच याप्रसंगी रुक्मिणीबाई लालबिगे यांचा सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय कार्यक्रमात सफाई कामगारांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. चिमुकली सर्पमित्र हर्षदा लोहिरे हिचादेखील सत्कार करण्यात आला.

संगीता तिवारी या वेळी म्हणाल्या की, शहरांना सुशोभित ठेवण्यात सफाई कामगारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोरोना महामारीच्या काळात सफाई कामगारांच्या कार्याची महती खऱ्या अर्थाने कळली. तुमच्या कार्याला खरंच आम्ही सॅल्यूट केले पाहिजे, परंतु असे असतानादेखील महापालिका प्रशासन हे सातत्याने सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आलेले आहे, त्यामुळे आता सर्वांनी संघटित होऊन कायदेशीर मार्गाने लढा देऊन आपल्या मागण्या सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे या वेळी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसच्या झेंड्याखाली कामगारांच्या मागण्यांसाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. मनपा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात आगामी काळात सर्व सफाई कामगारांनी संघटित होऊन जोरदार लढा द्यावा. तसेच पुढच्या वर्षीपासून कामगारांच्या सत्कारासह संघटना कामगारांना आर्थिक मदत देणे, संसारोपयोगी वस्तू प्रदान करणे, कामगारांचे आरोग्य तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत दिली जाईल.

सत्कार सोहळ्यात डॉ सुधाकर पणीकर यांचाही विशेष कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगर पालिकेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने सचिव सूर्यकांत यादव आणि एमएमजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र वाईकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *