आज उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. इतकंच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी टोलेबाजीही केली. देशात आता करोना नाही पण एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा व्हायरस निर्माण झाला आहे त्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांना निर्लज्जम सदा सुखी असंही म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?

“आपल्या देशात आता करोना व्हायरस नाही. पण एकाधिकारशाहीचा व्हायरस आहे. करोनापासून आपण जसे दोन हात लांब होतो तसेच या व्हायरसपासून दोन हात लांब राहा. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना धक्का बसला आहे. शिवसेनेतून कुणी गेलं म्हणतात शिवसेनेला धक्का, राष्ट्रवादीतून कुणी गेला की राष्ट्रवादीला धक्का. आज एक भ्रष्टाचारी भाजपात आला हा भाजपाला धक्का आहे. शिवसेनेला धक्का नाही. कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आली आहे.”

मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमची स्वप्नं पूर्ण होत नाहीत म्हणून तुम्ही इतरांचे पक्ष फोडत आहात का? पण शेतकऱ्यांचं काय? भाजपात काही लायकी नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात. आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, आज अशोक चव्हाणांना फोडलं. ही सगळी फोडाफोडी करुन काय मिळवलं? दिल्लीच्या सीमेवर शेतकरी येऊन ठेपले आहेत. लाखो शेतकरी आलेत त्यांना गृहमंत्री आणि पंतप्रधानांना भेटायचं आहे पण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.या सगळ्याची गरज काय आहे?

देशाचे गृहमंत्री आहेत अमित शाह, महाराष्ट्राचे आहेत देवेंद्र फडणवीस. त्यांचं कुठल्या शब्दांत वर्णन करावं तेच कळत नाही. कारण ‘फडतूस’ म्हटलं, ‘नालायक’ म्हटलं, ‘कलंक’ म्हटलं काही फरकच पडत नाही. आता बेगुमानपणाने वागत आहेत. निर्लज्जम सदासुखी अशी झाली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसले आहेत. त्यांची अवस्था आता ‘मला नाही अब्रू मी कशाला घाबरु’ अशी झाली आहे. मला अब्रूच नाही. मी असाच आहे, काय बोलणार अजून? निर्लज्ज असतो तोच सुखी असतो. मुख्यमंत्र्याचा पाव उपमुख्यमंत्री केला तरीही तो आनंदात आहे. नितिन गडकरी जे बोललेत जो निष्ठेने काम करतो त्याला किंमत नाही. हे अगदी खरं आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.