गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी उद्या (मंगळवारी, दि.07) मतदान होत आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षा (आरजीपी) च्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. मतदानाला एक दिवस असताना आरजीपीचे अध्यक्ष आणि उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. परब यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज परब यांनी एक मे रोजी तिस्क- उसगाव परिसरात प्रचार मिरवणूक काढली होती. यासाठी परब यांनी परवानगी घेतली नसल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

परब यांनी एक वाहन आणि 50 कार्यर्त्यांसोबत मिरवणूक काढली होती. याप्रकरणी सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी मनोज परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर फोंडा पोलिसांनी मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.