सत्ता पक्षात असो वा विरोधात आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, आबालवृद्ध, महिलांच्या हक्कासाठी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांशी भिडणारे बच्चू कडू हे अलीकडे वेगळेच रसायन ठरले आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दिव्यांगाच्या हक्काचा निधी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासनाने त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी विधिमंडळात कायदे करणारा आमदार अशी बच्चू कडू यांची राज्याच्या इतिहासात नोंद घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दिव्यांगासाठीचा निधी खर्च झाला अथवा नाही? याची शहानिशा करण्यासाठी थेट जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपलिकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेणारे आमदार बच्चू कडू ठरले. म्हणून राज्य सरकारने बच्चू कडू यांच्या मागणीनुसार राज्यात दिव्यांग विकास विभागाची निर्मिती केली.
मात्र शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांना राज्य सरकार बगल देत असल्याने संतप्त होऊन त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी पंगा घेतला. आमदार बच्चू कडू यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला, विधानसभेच्या अनेक जागांवर प्रहारचे उमेदवारदेखील उभे केले. बच्चू कडू अचलपूर मतदार संघातून तब्बल सहाव्यांदा नामांकन भरत आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या राजकीय वाटचालीकडे महायुती वा महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे.