Breaking News

अभिनेते रितेश देशमुख यांनी घेतली निक्की तांबोळीची शाळा; नेटकरी झाले खुश

“बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुख यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेतली. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या ‘भाऊच्या धक्क्या’वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेशने ‘भाऊच्या धक्क्या’वर तिची चांगलीच शाळा घेतली.

निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. हे पाहून रितेशसुद्धा तिच्यावर भडकला. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,”वर्षा ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोललात, ती भाषा मी खपवून घेणार नाही. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.” रितेश पुढे म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार”.

नेमकं काय घडलं होतं?

‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताच स्पर्धकांसमोर विविध आव्हानं उभी राहिली आहेत. यावेळी घरातील प्रत्येक सदस्याला बीबी करन्सी खर्च करून सामान विकत घ्यावं लागतंय. त्यातच बेड खरेदी न केल्याने बिग बॉसने सर्वांना जमिनीवर झोपावं लागेल असे आदेश दिले. तसंच घरात दिवसभर कोणीही बेडचा वापर करू नये, असंही सांगण्यात आलं होतं. तरीही काही स्पर्धकांकडून या नियमाचा भंग झाला आणि त्याचीच शिक्षा म्हणून बिग बॉसने संपूर्ण आठवडाभार बेडचा वापर करायचा नाही, अशी शिक्षा सुनावली आहे. यावरून निक्की वर्षा यांच्यावर भडकते. “तुमच्यामुळे आम्हाला भोगावं लागतंय. तुम्ही बाहेर खूप मोठ्या असाल पण घरात सगळेच सारखे आहेत”, अशा शब्दांत ती उसगांवकर यांना सुनावते. त्यानंतर वर्षासुद्धा तिला प्रत्युत्तर देतात. दोघांमधील ही बाचाबाची वाढतच जाते आणि नंतर दोघीही रडू लागतात.