सलमान खानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या हत्येने देशभरात खळबळ उडाली असून संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अशातच आता सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेर बॅरिकेड्स आहेत. सलमानच्या घराबाहेर किंवा जवळ कोणतेही वाहन थांबू दिले जात नाहीये.
याशिवाय सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकही त्याच्या घराबाहेर तैनात आहेत. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार, सलमानच्या घराबाहेर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी जोडला जात आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा सलमानसोबत जुना वाद असल्याने आणि त्याने अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
सलमानला लीलावती रुग्णालयात येण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र त्याचे मित्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी मिळाल्यानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही. सलमान रात्री उशिरा अडीच वाजता रुग्णालयात पोहोचला. त्याच्यासोबत कडेकोट सुरक्षारक्षक आणि रक्षक होते. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सलमानला आता हॉस्पिटलमध्ये न येण्याचा सल्ला दिला असून घरीच राहण्यास सांगितलं आहे. सलमान हॉस्पिटलमधून आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंता स्पष्ट दिसत होती.