kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अभिनेता स्वप्नील जोशींच्या हस्ते ५६ किलोचा केक कापून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळ्याचा समारोप 

कलाक्षेत्रात बालगंधर्व रंगमंदिरांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. देशात किंवा जगात कुठेही एखाद्या वास्तूचा वाढदिवस साजरा होत नसेल मात्र बालगंधर्व रंगमंदिराचा होतो आणि तो कलाकार साजरा करतात हि अत्यंत आनंदाची बाब आहे. अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली. 

बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरांच्या ५६ व्या वर्धापदिनानिमित्त आयोजित तीन दिवशीय सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी स्वप्नील जोशी बोलत होते. यावेळी जोशी यांच्या हस्ते ५६ किलोचा केक कापण्यात आला. याप्रसंगी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे, तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर,सोनू म्युझिक चे मारुती चव्हाण,गौरी पुणेकर, प्रतिक मुरकुटे,सर्व प्रायोजक,बालगंधर्व परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्वप्नील जोशी म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिरांचा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञ यांचा सहभाग आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आम्ही नायक म्हणून मालिका किंवा चित्रपटात दिसतो, पडद्यावर १० लोक दिसत असले तरी पडद्यामागे १५० लोक काम करतात त्यातील १४० लोक कधीच सामान्य प्रेक्षकांसमोर येत नाहीत, त्यांच्याकडून या वास्तूच्या वर्ध्यापानदिनासाठी पुढाकार घेण्यात येतो ही अशी महत्वपूर्ण बाब आहे.  

या तीन दिवशीय समारंभात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात लोकगीतांचा कार्यक्रम “आवाज महाराष्ट्राचा” सादर झाला यामध्ये गायत्री शेलार, किशोर जावळे, सार्थक शिंदे, अमर पुणेकर, अजय गायकवाड (मुंबई) आणि महागायक चंदन कांबळे यांनी सहभाग नोंदवला. तर रात्री  सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा बहारदार कार्यक्रम * L. P. Night * सादरकर्ते: हिम्मतकुमार पंड्या आणि गितांजली जेधे व सह कलाकारांनी सादर केला.