kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

कौतुकास्पद ! ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे 3 महिन्यात ५० प्रयोग! ; नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद

मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर हाऊस फुल्ल धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 3 महिन्यात या नाटकाचा गौरवशाली असा ५०वा प्रयोग येत्या ५ मे रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी ३.३० वाजता संपन्न होत आहे.

या गौरवशाली प्रयोगाबाबत बोलताना लेखक- दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की, “आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, अपार प्रेम केलं. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. आता नव्या संचात हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहे. हे नाटक लवकरच विश्वविक्रमी टप्पा गाठेल याची खात्री आहे”.

नाट्यरसिकांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने ‘अनामय’ नाट्यसंस्थेची निर्मिती असलेलं ‘ऑल दि बेस्ट’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर नवीन संचात रूजू झालं आहे. आता या नाटकातील नवीन संचातील कलाकारांना माय-बाप रसिक प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. ज्यांनी हे नाटक २५ वर्षांपूर्वी पाहिल होत ते त्यांच्या मुलांना नाटक बघायला घेऊन येत आहेत!!! त्यामुळे तरुण पिढी सुद्धा थिएटरकडे वळली आहे. म्हणुनच अवघ्या ३ महिन्यात या नाटकाचा गौरवशाली असा ५०वा प्रयोग येत्या ५ मे रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे दुपारी ३.३० वाजता संपन्न होत आहे.

देवेंद्र पेम लिखित हे नाटक ९०च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजलं. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि हजारो हाऊस फुल्ल प्रयोग करत रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला. अनेक कलाकारांनी ऑल दि बेस्ट नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. अंकुश चौधरी भरत जाधव संजय नार्वेकर हे सुपरस्टार झाले!!! या नाटकाने मराठीत अत्यंत कमी वर्षात ४५०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. ‘ऑल द बेस्ट’ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर १२ भाषांमध्ये प्रदर्शित झालं असुन त्याचे जवळ जवळ १०००० प्रयोग होत आले आहेत. ३० वर्षांपूर्वी आलेलं हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात पुन्हा येऊन त्यांनी ५० प्रयोगांचा टप्पाही गाठला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विनोदाची थंडगार धबधबा घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज झालं आहे. या नाटकाच्या नव्या संचात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री हे कलाकार पाहायला मिळत आहेत.