बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या व्हॅन मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. यात आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन, पोलीस त्याला नेत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ गोळी चालवलेली आहे. त्यानंतर अक्षय शिंदेला दवाखान्यात नेण्यात आलं. यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला आहे.”