राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळत असून सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा पार पडत आहेत. दरम्यान, अशाच एका प्रचारसभेसाठी जाताना वणी येथे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. यावरून आधीच राजकीय वातावरण तापू लागलं असताना आता महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याची बॅग तपाण्यात आल्याचे पुढे आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार अमोल कोल्हे यांची बॅग तपासण्यात आली आहे. आमदार अमोल कोल्हे यांनी एक्स समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शेअर केला.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
आज पुन्हा एकदा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा ही तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही बॅग तपासण्यात आली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमदेवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे हे सोमवारी वणी येथे हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हेलिपॅडवर ते उतरले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करत असताना तेथे अचानक काही पोलीस व निवडणूक विभागाचे तपासणी पथक दाखल झाले. त्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरने आलेल्या व्यक्तींच्या बॅगा तपासायच्या असल्याचे सांगितले.
या प्रकाराने हेलिपॅडवर काही काळ गोंधळ उडाला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केला. स्वत: उद्धव ठाकरे तपासणी पथकाला हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात, असा प्रश्न केला. बॅगा सर्वांच्याच तपासता का? असे त्यांनी विचारले. तपासणी पथकाने हे आपले काम असल्याचे सांगत बॅगा तपासणीस सुरूवात केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वत: या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केले. या तपासणीत पथकाच्या हाती काही लागले नाही. मात्र यामुळे वणीतील वातावरण चांगलेच तापल्यांचं बघायला मिळालं.