ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिले. यानंतर या भेटीवेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या भेटीनंतर त्यांनी लवकरच याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन असे आश्वासन अजित पवारांनी अंजली दमानिया यांना दिले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. याच प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावरील दोन दिवस उपचार सुरु होते. या उपचारावर अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
यानंतर अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. अखेर आज संध्याकाळी अंजली दमानिया आणि अजित पवारांची भेट झाली. या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत काय चर्चा झाली, याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
“मी २५ ते ३० मिनिटे त्यांना भेटली. हे माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य आहे, असे त्यांनी मला सांगितले. मग त्यावर मी त्यांना तुम्ही राजीनामा का घेत नाहीत, असे विचारले. मी त्यांना सर्व पुरावे दिले. आज मी त्यांना धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत? त्यांच्या कंपनीत आर्थिक नफा कसा मिळतो? ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसं बसतंय? त्यामुळेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही राजीनामा घ्यायला हवा याबद्दलचे सर्व पुरावे दिले”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
“वाल्मिक कराडचे समर्थक हे दहशतवादी आहेत. त्यांनी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे. त्याचे सर्व फोटो, रिल्स मी त्यांना दाखवले. त्यांनी ते सर्व शांतपणे पाहिलं. त्यांनी मला असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मीटिंग आहे. त्यावेळी आम्ही तुम्ही दिलेल्या या सर्वच्या सर्व कागदपत्रांवर चर्चा करु. मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा केल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ”, असे अंजली दमानियांनी म्हटले.
“मला खात्री आहे की जनभावना आहे, आक्रोश आहे, जे कृत्य झालं ते फारच निर्घृण होत. त्यामुळेच आपण हा लढा देत आहोत. हे देखील मी त्यांना सांगितलं. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेले कृत्य यापुढे कधीही होऊ नये, असं महाराष्ट्रात घडू नये, असं त्यांचंही म्हणणं आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं तातडीने आवश्यक आहे. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सर्व कागदपत्र दाखवू आणि योग्य तो निर्णय घेऊ”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.