Breaking News

१२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा ‘अलबत्या गलबत्या’ फेम सनीभूषण मुणगेकरचा मानस

मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम करणाऱ्या रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात नायकाची भूमिका साकारत बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनीभूषण मुणगेकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मराठी रंगभूमीवर लक्षवेधी कामगिरी करणारा सनीभूषण एक अनोखा प्रयोग करण्यासाठी सज्ज झाला आहे. सनीबॅाय एन्टरटेन्मेंटचा सनीभूषणच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टेक ईट इझी उर्वशी’ या मराठी चित्रपटाचा प्रीमियर दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाला. यासोबतच यंदा १२ महिन्यांत १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा सनीभूषणचा मानस आहे.

वेगवेगळ्या माध्यमातून मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपुढे पोहचवण्यासाठी जो प्रयत्न होतोय तो अत्यंत कौतुकास्पद आहे. अभिनेता सनीभूषण मुणगेकर याने त्यासाठी उचलेले पाऊल मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. त्याच्या या अनोख्या प्रयोगाला माझ्या मनापासून शुभेच्छा असं सांगताना अभिनेते विजय पाटकर यांनी मराठी चित्रपटांसाठी ठोस काहीतरी कृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.

मागच्या वर्षाच्या अखेरीस पुण्यामध्ये नाट्यगृहात मराठी चित्रपट दाखवण्यात आल्यानंतर आता मुंबईतही हा प्रयोग ‘टेक ईट इझी उर्वशी’ या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात आला. सनीभूषण दिग्दर्शित, निर्मित आणि अभिनीत ‘टेक इट इझी उर्वशी’ या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच झाला. या चित्रपटाचे निर्माते हरेश ठक्कर असून, सनीभूषणने निखिल कटारेच्या साथीने दिग्दर्शन केले आहे. कथा, पटकथा, संवाद सनीभूषण आणि महेश शिंदे यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात सनीभूषणचा डबल धमाका पाहायला मिळेल. यात सनीसोबत जनार्दन लवंगारे, नूतन जयंत, आनंदा कारेकर, सुचित जाधव, दीपाश्री कवळे, हर्षदा पिलवलकर आदी कलाकार आहेत. यांच्या जोडीला रंगभूमीवर काम करणाऱ्या नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे. श्री शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे कोणताही नवीन चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतो, पण हे सर्व चित्रपट गुरुवारी प्रदर्शित करण्याची योजना आहे. महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात चित्रपटांचा प्रीमियर होणार आहे. त्यानंतर नियमित शोज होतील.

याबाबत सनीभूषण म्हणाला की, २०२४मध्ये मी एकूण १२ मराठी चित्रपट तयार केले आहेत. हे सर्व चित्रपट या वर्षात रिलीज होणार आहेत. यातील ‘टेक इट इझी उर्वशी’ हा पहिला चित्रपट आहे. या निमित्ताने प्रेक्षकांना नाट्यगृहात चित्रपट पाहण्याचा अनुभव घेता येईल. यासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे वापरण्यात येणार आहेत. या माध्यमातून नाट्यगृहासाठी एक नवीन व्यवसाय सुरू होणार आहे. या निमित्ताने चित्रपटाशी निगडीत असलेल्या इतर छोट्या जोडधंद्यांनाही चालना मिळेल.

या उपक्रमातील १२ चित्रपट तयार असून, सर्व चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय सनीभूषणने केले आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या १२ चित्रपटांमध्ये विनोदाच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळणार आहेत. यात ब्लॅक, सस्पेन्स, रोमँटिक, स्लॅपस्टिक, हॅारर, साय-फाय, नॅचरल कॅामेडीचा समावेश आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. ‘टेक इट इझी उर्वशी’, ‘सोलोमन आयलँड’, ‘वारसदार’, ‘जोडीचा मामला’, ‘अपना टाईम आएगा १’, ‘अपना टाईम आएगा २’, ‘अपना टाईम आएगा ३’, ‘एसएमएस – श्रीरंग मनोहर सूर्यवंशी’, ‘गण्या धाव रे’, ‘आले फंटर ‘, ‘आले फंटर रिटर्न्स’, ‘आले फंटर अगेन’ हे १२ चित्रपट यंदा प्रत्येक महिन्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोमवार ते शुक्रवार नाट्यगृहात नाटकांचे फार प्रयोग होत नाहीत. त्या वेळेत चित्रपटाचे शोज दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *