जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. बांदीपोरा जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बांदीपोरा जिल्ह्यातील वुलर पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील सदर कूट पायन भागात वळण घेण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्यानंतर ट्रक थेट टेकडीवरून दरीत कोसळला. अपघातानंतर जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दोन जणांचे प्राण वाचवण्यात अपयश आले. तर, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बांदीपोरा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसरत इक्बाल वानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराच्या ट्रक दरीत कोसळल्याने एकूण पाच जवान जखमी झाले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात आणण्यात आले. यापैकी दोन जवानांना मृत घोषित करण्यात आले. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी श्रीनगरला पाठविण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून ५ जवान शहीद झाल्याची घटना गेल्या आठवड्यात मंगळवारी घडली. लष्कराच्या नगरोटा स्थित व्हाईट नाईट कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या वाहन दरीत कोसळले. या घटनेत पाच जवान शहीद झाले. तर, र चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पूंछ येथील फिल्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता निलम मुख्यालयातून नियंत्रण रेषेवरील बलनोई घोरा पोस्टकडे निघालेल्या ११ मराठा लाईट इन्फंट्रीच्या लष्कराच्या वाहनाला घोरा पोस्टजवळ अपघात झाला. लष्काराचे वाहन सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात चालकासह १० जवान गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जवान शहीद झाले. तर, पाच जणांवर उपचार सुरू आहेत.