दलापुरातील एका नामांकीत शाळेत दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या घटना घडून 6 दिवस झाले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलक आज सकाळी आठ वाजता बदलापूर रेल्वे स्थानकावर जमले. आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल रेल्वे वाहतूक ठप्प केली. सकाळी आठ वाजेपासून आंदोलकांनी रेल्वे सेवा ठप्प केली. आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत होती. पण आंदोलकांनी ऐकून घेतलं नाही. जवळपास 10 तास रेल्वे वाहतूक ठप्प केली. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांच्या या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
बदलापुरातील आंदोलनाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम पडला आहे. नागरिकांचं सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी आंदोलन सुरु होतं. त्यामुळे अंबरनाथ ते खोपोली दरम्यान आतापर्यंत 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते अंबरनाथदरम्यान लोकसेवा सध्या सुरळीत सुरु आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस कल्याणवरुन वळवली आहे. रेल्वे सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.