रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसईमधील डोंगरमाथ्यावर असलेल्या इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या वणव्याने अख्खं गाव बेचिराख करुन टाकलंय. या वणव्यात 44 घरं, 15 गोठे आणि एक शाळा जळून खाक झाली आहे. त्यासोबतच वनसंपदेचीही प्रचंड हानी झाली आहे.
या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सगळं गावचं आगीने बेचिराख करुन टाकलं आहे. हे गाव डोंगरमाथ्यावर वसलेलं आहे. इंदरदेव धनगरवाडी याच नावाने या डोंगराला ओळखलं जातं. इथे धनगर समाजातील जवळपास 45 कुटुंबं राहतात. हातावरची मोलमजूरी तसेच दुग्ध व्यवसाय करत पोट भरणारे हे गावकरी आहेत.
उन्हाळा सुरू झाला की, या गावातील बहुतेकजण पाण्याच्या अभावी तसेच उन्हाच्या तडाख्यामुळे उदरनिर्वाहासाठी डोंगर पायथ्याला वस्तीसाठी जातात. जिथे मिळेल तिथे आपली गुरेढोरे बांधून कुटुंबासहित आसरा घेतात. इतरवेळी पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ही वस्ती पुन्हा आपल्या मूळ पारंपारिक घरांमध्ये म्हणजेच डोंगरमाथ्यावर वसलेल्या इंदरदेव धनगरवाडीमध्ये रहायला जाते.
सध्या उन्हाळ्यामुळे या गावातील बहुतेकजण राहण्यासाठी पायथ्याला गेले होते. काहीजण डोंगरमाथ्यावर राहत होते मात्र मजूरीसाठी बाहेर गेले होते. रोहा तालुक्यातील या भागात वारंवार वणवे लागत असतात. मात्र, दोन दिवसांपासून लागलेल्या या वणव्याची माहिती वनविभागाला असूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. याबाबत खबरदारी न घेतल्यामुळे तसेच सावधगिरीचा इशारा गावकऱ्यांना न दिल्यामुळेच ही घटना घडली असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.