नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तीन देशातील जमीन हादरली. तिबटेसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले. लोकांनी जीव मुठीत घेत पळापळ केली. आज सकाळीच भूकंपाचे हादरे जाणवल्याने अनेकांची साखर झोप उडाली. कुटुंब कबिल्यासह अनेक जण रस्त्यावर आले. सकाळी 6.40 वाजता हा भूकंप जाणवला. 5-10 सेकंदापर्यंत जमीनखाली हादरे जाणवले.
मंगळवारी सकाळी तीन देशात या भूकंपाने जनतेला भयभीत केले. भूकंपाचे केंद्र तिबेटमध्ये होते. त्याची तीव्रता रिश्टेर स्केलवर 7.1 इतकी नोंदवली गेली. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेनुसार, नेपाळ आणि भारतातील सिक्कीमच्या सीमावर्ती भागात सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदु नेपाळमधील लोबूचे येथून जवळपास 91 किमी दूर होता. भूतान आणि बांगलादेशातील काही भागात भूंकपाचे झटके जाणवले.
भूकंपाचे स्वरूप पहिल्यांदाच इतके व्यापक दिसले. तिबेटमध्ये तर एकामागून एक भूकंपाचे हादरे जाणवत होते. सिन्हुआनुसार, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार, सकाळी 7.02 वाजता दक्षिण-पश्चिम चीनच्या शिजांग परिसरात 4.7 तीव्रतेचा भूकंप आला. त्यानंतर 9:37 मिनिटांनी 4.9 तीव्रतेचा भूकंप आला. अर्ध्या-अर्ध्या तासाच्या फरकाने भूंकपाचे तीन मोठे हादरे जाणवले. तर अधूनमधून सौम्य धक्के जाणवत होते.
भारताच्या पूर्वेत्तर राज्यांशिवाय पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये पण भूकंपाचे धक्के जाणवले. समाज माध्यमांवर लोकांनी भूकंप होताना घर हलल्याचे, वस्तू हालल्याचे, काहींनी जमीन दुभंगल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्र शेअर केले. या भूकंपाने किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.