काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्यानं वैद्यकीय तपासणीसाठी ते ठाण्यातील रुग्णालयात पोहोचले आहेत. डॉक्टरांनी त्यांना प्रकृतीची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांना अॅडमिट करून घेतलं जाण्याची शक्यता आहे. तब्बल तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे आज घराच्या बाहेर पडले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झालं आहे. त्यांच्या शऱीरात पांढऱ्या पेशी वाढल्या आहेत. डॉक्टर त्यांचं सीटी स्कॅन करणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात सध्या नव्या सरकारच्या स्थापनेची लगबग सुरू आहे. नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ते काळजीवाहू मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत आहेत.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याची सरकारमधील भूमिका काय असेल, याविषयी उत्सुकता आहे. नव्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होणार की केंद्रात मंत्रिपद स्वीकारणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दिल्ली दरबारी या संदर्भात काही बैठकाही झाल्या. मात्र, त्यात ठोस तोडगा निघाला नसल्याचं समजतं.