Breaking News

मोठी बातमी ! रवींद्र वायकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेचे मुंबईतील वरिष्ठ नेते रवींद्र वायकर यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले की, मी मागच्या पन्नास वर्षांपासून शिवसेनेसोबत काम करत आलेलो आहे. तीनवेळा आमदार आणि अनेकदा नगरसेवक झालेलो आहे. आरेमधील ४५ किलोमीटरचे रस्ते होणं गरजेचं आहे. त्यासाठी १७३ कोटी रुपये पाहिजे आहेत. काही ठिकाणी पाण्याची सोय नाहीये. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ते घेतले नाहीत तर लोक नाराज होतील. सत्तेमध्ये असल्यानंतरच हे कामं मार्गी लागतील.

वायकर पुढे म्हणाले, देशामध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे. ते चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे वेगवेगळे निर्णय घेत आहेत. माझे प्रश्न सुटले नाहीत तर मी लोकांसमोर जावू शकत नाही. त्यामुळे मी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रवींद्र वायकरांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “वायकरांनी बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शुभेच्छा देतो. बाळासाहेबांच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या विचाराचं पालन आम्ही केलं.”वायकरांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सांगितले आहेत.

देशात नरेंद्र मोदींचं विकासाचं पर्व आहे. देशाला जगभरात उच्च स्थानावर त्यांच्या कर्तृत्वानं पोहोचवलं आहे. महायुतीच्या माध्यमातून आपण जे दीड वर्षात निर्णय घेतले त्याचा परिणाम वायकरांवर झाला त्यामुळं विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला.”तसंच, “आमच्या काही गैरसमज होता तो आम्ही बसल्यानंतर निघून गेला. तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. तो दूर झाला. आमदार, खासदारांनी विश्वास ठेवला आहे. दीड वर्षात सर्व वर्गातील लोकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळं लोकांना आपलं सरकार वाटत आहे,” असं शिंदे म्हणाले.