Breaking News

मोठी बातमी ! वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक दावे

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनाप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा काही दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण आला. मात्र अजूनही काही आरोपी मोकाट फिरत असून त्यांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र हत्येच्या घटनेत आरोपी असलेला वाल्मिक कराड हा ज्या गाडीतून पोलिसांना शरण आला, त्यावरून आता रणकंजन माजलं आहे. कारण तो ज्या गाडीतून शरण आला ती गाडी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील आहे, असा आरोप बीडचे खासदार बजंरग सोनावणे यांनी केला होता. ताफ्यामधील आरोपी तिथे जाऊन सरेंडर होतो. मस्साजोगला ही गाडी होती. त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणगती देतोय. गाडी कोणाच्या नावावर आहे?” असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला होता. आता या मुद्यावरून नवा वाद सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हा मुद्दा उचलून धरत त्यावरून काही धक्कादायक दावे केले आहेत. आव्हाड यांनी काल रात्री काही ट्विट्स करत खळबळजनक दावे केले आहेत.

” ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? ” असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

” आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, “आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई, पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने आमच्या मागे लागले आहेत.” वा रे… वाह ! आधुनिक महाराष्ट्र ” असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी आज उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. मा. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या…

एवढंच नव्हे तर याआधीही जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक पोस्ट लिहीली होती, त्यामध्येही त्यांनी वाल्मिक कराडवरून संशय व्यक्त करत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. वाल्मिक कराडला कधी केजला नेणार, हेदेखील लोकांना माहित होते. त्यामुळेच पुणे आणि केज येथे अराजकता माजवण्यासाठी हजारो लोकं तयार ठेवली होती, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

” सर्वोच्च न्यायालयाचे निकाल स्पष्टपणे सांगतात की, जर एखाद्या महत्वाच्या गुन्हेगाराला न्यायालयात हजर करायचा असेल तर त्याला व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे देखील हजर करता येऊ शकते. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याला केजला नेण्यात आले. वाल्मिक कराड हा पुण्यात सरेंडर होणार, हे सबंध महाराष्ट्राला माहित होते. वाल्मिक कराडला कधी केजला नेणार, हेदेखील लोकांना माहित होते. त्यामुळेच पुणे आणि केज येथे अराजकता माजवण्यासाठी हजारो लोकं तयार ठेवली होती. म्हणजेच, एवढी अराजकता आणि एवढी दहशत मला वाटत नाही, मुंबईच्या गँगवाॅरमध्येही कुणी माजवली असेल! मला बीडमधील लोकांना आठवण करून द्यायची आहे की, मुंबईत अनाचार, अराजकता माजवणारा अंडरवर्ल्ड आणि त्यांचा गँगवॉर जर कुणी संपविला असेल तर त्यातील एक नाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे होते. गँगवॉर संपविणार्या गोपीनाथ मुंडेंच्या बीडमध्ये दहशत माजवण्याची आणि गँगवॉरची जी तयारी होत आहे, ती तर इटलीमधील माफियांना लाजवेल इतकी भयानक आहे ” असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

” उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जी गाडी होती , तीच गाडी आरोपी पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वापरतो, हे तर गणित कधीच न सुटण्यासारखेच आहे. महाराष्ट्राची राजकीय गुंडगिरी ही फक्त राजकीय नेतृत्वाने पोसायची, याचा अर्थ स्पष्ट होतो की, महाराष्ट्राला बरबाद करण्याची सुपारी घेण्यासारखेच आहे. हे सर्व धक्कादायक आहे; पण, यात सर्वात मोठी जी अधोगती आहे ती म्हणजे पोलिसांची जी प्रतिमा आणि त्यांची काम करण्याची पद्धत डागाळली आहे. ज्या पोलिसांचे घोषवाक्य “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असे आहे; ते वाक्य आता या राजकीय गुंडगिरीमुळे #खलरक्षणाय_सद्रनिग्रहणाय असे वाचावे लागते की काय, असे भय वाटू लागले आहे.” असे त्यांनी लिहीलं आहे.

” महाराष्ट्र हे बिहार नाही तर महाराष्ट्र आता आफ्रिकेतील सर्वाधिक क्राईम रेट असलेल्या पीटरमारित्झबर्ग शहराप्रमाणे झाले आहे. एखाद्या माणसाला उचलून न्यायचे आणि थेट गायबच करून टाकायचे, असे प्रकार फक्त आफ्रिकेत व्हायचे; तेच आता बीडमध्येही घडते, हे आता उघड होऊ लागले आहे.

खा. बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले आहेत; त्यांची उत्तरे महाराष्ट्र पोलीस कधी देणार ? हे महाराष्ट्र पोलिसांनी आता जाहीर करावे. बस्स… खूप झाले आता ! आता शांत बसण्याचे कारण नाही. वेळप्रसंगी पोलीस मुख्यालयावर मोर्चा न्यावा लागला तरी चालेल, पण आता पोलिसांना तोंड उघडावेच लागेल अन् खरं काय ते सांगावेच लागेल ! ” असेही आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *