बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सरप्राइजेस मिळाले. आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे. बुक्कीत टेंगूळ देत सूरजने झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि निक्की तांबोळी हे सदस्य बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट होतं. सूरजने ट्रॉफी जिंकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इंडियन आयडॉलनंतर रिएलिटी शोचा विजेता होण्याचं अभिजीत सावंतचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं. अभिजीत बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता ठरल्याने त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

सूरजने सर्वाधिक वोट मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत फर्स्ट रनर अप ठरला तर निक्की तांबोळीला तिसरं स्थान मिळालं. धनंजय पोवार चौथ्या तर अंकिता वालावलकर पाचव्या स्थानावर राहिली. ९ लाख रुपयांची बॅग घेऊन जान्हवी किल्लेकरने सहाव्या क्रमांकावर राहणं पसंत केलं.

बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलेल्या सूरजला ‘बिग बॉस मराठी ५’चा लोगो असलेला डोळा आणि पाठीमागे यंदाची थीम असलेलं चक्रव्यूह अशी यंदाच्या पर्वाची ट्रॉफी मिळाली आहे. या ट्रॉफीबरोबरच विजेत्याला १४.६० लाख रुपये मिळाले आहेत. तर इलेक्ट्रिक स्कूटरही सूरजला मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *