kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

संसदेत खासदार जखमी झाल्यानंतर भाजपाकडून मोठे पाऊल ; राहुल गांधींविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार

दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. काल अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले होते. त्यावेळी संसदेच्या मकरद्वारापाशी काँग्रेस आणि भाजपा आमदार आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली यामध्ये भाजपाचे ओडिशातील खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि खासदार मुकेश राजपूत जखमी झाले होते. दरम्यान राहुल गांधींनी दुसऱ्या एका खासदाराला धक्का दिल्यामुळे आपल्याला जखम झाल्याचा आरोप प्रताप चंद्र सारंगी यांनी केली आहे. त्यानंतर आता भाजपाने दिल्लीतील संसद मार्ग ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली आहे.

भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकूर, खासदार बन्सुरी स्वराज आणि हेमांग जोशी यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात कलम १०९, ११५, ११७, १२५, १३१ आणि ३५१ नुसार संसद मार्ग पोलीस ठाण्यात स्टेशनमध्ये भाजपा खासदारांना धक्का देऊन जखमी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने एक्सवर माहिती दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, “आम्ही राहुल गांधींविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि धमकी दिल्याबद्दल दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आज मकरद्वारच्या बाहेर घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती आम्ही तक्रारीत दिली आहे. यामध्ये हत्येच्या प्रयत्न केल्याच्या तक्रारीचाही समावेश आहे.”

सकाळी मकरद्वारापाशी झालेल्या झक्काबुक्कीनंतर प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोन्ही खासदारांना तातडीने दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, सारंगी आणि राजपूत या दोघांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्यात दुखापत झाली असून, त्यांच्या कवटीला खोल जखम झाली आहे. तर धक्काबुक्की झाल्यानंतर बेशुद्ध झालेले खासदार राजपूत पुन्हा शुद्धीवर आल्याचे सांगण्यात आले, परंतु तरीही त्यांना चक्कर येत होती तसेच उच्च रक्तदाबाचा त्रासही होत होता.