छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीला ओळखले जाते. बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व नुकतंच पार पडले. बारामतीचा सूरज चव्हाण हा यंदाच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. यानंतर त्यांचे सर्वच स्तरावरुन कौतुक झाले. सूरज चव्हाणला बिग बॉसची चकचकीत ट्रॉफी आणि चेकही मिळाला. यानंतर सूरज चव्हाण हा चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांचे पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी सूरज चव्हाण आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांनी सूरजसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सूरज चव्हाण हा अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झाला. यावेळी अजित पवारांनी सूरज चव्हाणला चांगलं घर बांधून देणार असल्याची घोषणा केली. तसेच त्याचे कुटुंब, भविष्यातील प्लॅन्स याबद्दलही अजित पवारांनी चौकशी केली. या भेटीदरम्यान अजित पवारांनी सूरजला मिळालेली बिग बॉस विजेत्याची ट्रॉफी हातात घेऊन पाहिली.

सूरज चव्हाणसोबत गप्पा मारत असताना अजित पवारांनी बिग बॉसची ट्रॉफी हातात घेतली. त्यावेळी अजित पवारांनी पटकन अरे खूप जड आहे रे ट्रॉफी असे म्हटले. यानंतर अजित पवारांनी सूरजला तू रिल्स कसे करतो, याबद्दल विचारणा केली. त्यावर सूरजने रिल्स शूट करण्यापासून ते कसे तयार केले जातात याची माहिती अजित पवारांना दिली.

यानंतर अजित पवारांनी बिग बॉस विजेत्या सूरज चव्हाणचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सूरजने अजित पवारांसमोर त्याचा गाजलेला झापुक झुपूक डायलॉगही म्हटला. हा डायलॉग ऐकल्यावर अजित पवारही हसायला लागले. यानंतर अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्तीही त्याला भेट म्हणून दिली. यानंतर अजित पवारांनी सूरजला मिळालेल्या पैशांबद्दल विचारणा केली.

तुला मिळालेले पैसे बँकेत टाकलेस का? बँकेत खातं उघडलंस का? पैसे फिक्सला टाकलेस का? असे अनेक प्रश्न सूरजला विचारले. त्यावर सूरजने हो बँकेत पैसे ठेवलेत असे सांगितले. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सूरजचे कौतुक केले. सूरज हा आमच्या बारामती मधील मोढवे गावाचा आहे. सुरवातीला रिल्स काढत असताना सुरजला बिग बॉस मध्ये संधी मिळाली. सूरजचा मनमोकळा स्वभाव आणि थोडं बोलण्यात अडकण हे लोकांना भावलं, असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *