यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले आहे. एकच एक्झिट पोल असा आहे की, ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. यानंतर आणखी एक एक्झिट पोल आला आहे.
अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला आहे. यामध्ये महायुतीच पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते, असा कौल देण्यात आला आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला ९८ ते १०७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ५३ ते ५८ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना २ ते ५ जागा मिळतील, असा अंदाज यात देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरेल. काँग्रेसला २८ ते ३६ जागा, शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३२ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २६ ते ३० जागा आणि मविआतील अन्य पक्षांना २ ते ४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महायुतीला एकूण ४८ टक्के मते मिळतील. यामध्ये भाजपाला २७ टक्के, शिवसेना शिंदे गटाला १३ टक्के, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ टक्के आणि महायुतीतील अन्य पक्षांचे व्होट शेअरिंग एक टक्का असेल, असा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला एकूण ३७ टक्के मते मिळतील. यामध्ये काँग्रेसला १३ टक्के, ठाकरे गट १२ टक्के, शरद पवार गटाला ११ टक्के आणि मविातील अन्य पक्षांना १ टक्का मते मिळतील, असा अंदाज आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज देण्यात आला असला तरी वंचित बहुजन आघाडीला ३ टक्के मते मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अन्य अपक्षांना ६ ते १२ जागा मिळू शकतात, असे म्हटले आहे. अन्य यामध्ये बसपा, बविआ, मनसे, रासपा, पीजीपी, एमएसपी यांसह आणखी काही पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व पक्षांना मिळून एकूण १२ टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.