Breaking News

भाजपने गुगलवर १०० कोटींचा निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम केला – अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशात इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच गाजत होता. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. मात्र आता गूगल वरील जाहिरातींचा मुद्दा तापत आहे. दावा केला जात आहे की, भाजपने गूगलच्या माध्यमातून प्रचारासाठी आपल्या जाहिराती दिल्या. यासाठी पक्षाने तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले आहे. याबाबत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

अखिलेश यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपने गूगल एड्सवर १०० कोटींचा प्रचार करण्याचा विक्रम केला आहे. हा जनतेचा पैसा आहे.एकीकडे भ्रष्टाचारी भाजपने निवडणूक देणगीच्या रुपात कंपन्यांकडून घेतला आहे आणि कंपन्यांनी आपल्या नफ्याच्या रुपात जनतेकडून वसूल केला आहे. दुसरीकडे कोरोना काळात घपलेवाला केअर फंड उभा करून भाजपने थेट जनतेकडून पैसा वसूल केला आहे. हा जनतेच्या पैशांसोबतच नव्हे तर जनतेच्या भावनेशीही खेळ आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, भाजपला वाटते की, निवडणुका मतांनी नाही तर नोट आणि धोक्याने जिंकल्या जातात. आता जनतेने पहिल्या चार टप्प्यात भाजपला चारीमुंड्या चीत करून त्यांचा संभ्रम दूर केला आहे. सातव्या टप्प्यापर्यंत भाजपचे नाव घेणाराही कोणी उरणार नाही.या निवडणुकीत डिजिटल माध्यमातून (Digital Media) प्रचारावर खूप जोर देण्यात आला. याच प्रचार प्रसारासाठी काही मीडिया रिपोर्टसनुसार भाजपने जवळपास १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा गुगलवर जाहिराती देण्यासाठी खर्च करण्यात आला आहे.

भाजपबरोबरच काँग्रेसने जवळपास ४५ कोटी, डीएमकेने ४० कोटी, वायएसआरसीपीने १० कोटी आणि टीएमसीने जवळपास पाच कोटी रुपये गूगल एड्स वर खर्च केले आहेत. त्याचबरोबर टीडीपी आणि बीजेडीनेही गूगल एड्स वर भरभरून खर्च केला आहे.