महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांच्या दिल्लीत बैठका सुरु आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी ६६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या ६६ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ११ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचंही नाव असून त्यांना सरायकेला मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रमुख उमेदवारांपैकी माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी हे धनवार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. तसेच सीता सोरेन यांना जामतारा आणि गीता कोडा यांना जगन्नाथपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच पक्षाने बाबुलाल सोरेन यांना घाटशिला मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तसेच लोबिन हेमब्रम यांना बोरीओमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच जमशेदपूर पूर्व येथून माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची सून पोर्णिमा दास यांना उमेदवारी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना सरायकेला मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. तसेच चंपाई सोरेन यांचा मुलगा सुनील सोरेन यांनाही दुमका येथून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, आता झारखंडमध्ये भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता विरोधकांच्या उमेदवारांची यादीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये मतदान कधी आहे?

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी जाहीर केली. महाराष्ट्रात एका टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे, तर झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तसेच या निवणडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *