महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांबद्दल केलेल्या भूतकाळातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याचबरोबर त्यांनी मुंबई हल्ल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचा आरोप करणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस यांनी ही टीका निराधार आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आणि २००८ चा प्राणघातक हल्ला पाकिस्तानमधून घडवून आणल्याचे पुरावे असल्याचे सांगितले.
या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हाणाले, “सर्वप्रथम, मी मूर्खांसारखे बोलणाऱ्यांना उत्तर देत नाही. जेव्हा कसाबला फाशी देण्यात आली आणि त्यानंतर जेव्हा डेव्हिड हेडलीचा जबाब नोंदवण्यात आला, तेव्हा हे स्पष्ट झाले की हा संपूर्ण कट पाकिस्तानमध्ये रचण्यात आला होता.”
“जे लोक कट रचल्याचे इतर सिद्धांत (२६/११ मध्ये आरएसएसच्या सहभागाबद्दल) पसरवतात, त्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही. आता या हल्लाचा कट रचणारा प्रमुख सूत्रधार आपल्या ताब्यात आहे आणि यातून आता आणखी गोष्टी उघडकीस येतील,” असे फडणवीस पुढे म्हणाले. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
काय म्हणाले होते दिग्विजय सिंह?
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह २०१० मध्ये, म्हणाले होते की मुंबई दहशतवादी हल्ल्यापूर्वी माजी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी त्यांना दूरध्वनीवरून सांगितले होते की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हाताळण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांना उजव्या विचारसरणीच्या गटांकडून धोका आहे.
सिंह म्हणाले होते की करकरे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी लक्ष्य केले होते. यासह सिंह यांनी करकरे यांच्या मृत्यूसाठी संघाला जबाबदार धरले होते. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यादरम्यान तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला होता.
तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले असून, त्याला एनआयए च्या विशेष न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी सुनावली आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये अशाच प्रकारचे दहशतवादी कट रचले गेले असल्याचा संशय तपास संस्थेला आहे. कटाची संपूर्ण व्याप्ती एकत्रित करण्यासाठी, अधिकारी राणाला विविध ठिकाणी घेऊन जाऊ शकतात.
Leave a Reply