छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते (शरदचंद्र पवार) आणि मुंबई युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात, त्याची अंमलबजावणी करत नाहीत, असा आरोप केला. हा फक्त एक घोटाळा आहे. असे ते म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले ॲड. अमोल मातेले ?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशभर शिवभक्तांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे. नुकतीच उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, हे स्मारक ताजमहलपेक्षाही जास्त लोकांना आकर्षित करेल, असेही ते म्हणाले.
मात्र, २०१६ मध्ये मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज २०२५ सुरू होत आहे, तरीदेखील त्या स्मारकाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री महोदयांनी आधी मुंबईतील शिवस्मारकाच्या प्रकल्पाला गती द्यावी आणि मग नवीन घोषणांची पेरणी करावी.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या मते, मुख्यमंत्री महोदय केवळ घोषणांचा पाऊस पाडतात, मात्र एकाही घोषणांची अंमलबजावणी करत नाहीत. हे केवळ फसवणूक आहे. शिवभक्त आणि महाराष्ट्रातील जनता वारंवार फसवली जात आहे. सरकारने या राजकीय खेळात महाराजांच्या नावाचा वापर थांबवावा आणि प्रत्यक्ष कृती करावी.
जनसामान्य शिवभक्तांची भावना अशी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे फक्त राजकीय घोषणा आणि आश्वासनांपुरते मर्यादित राहू नये. प्रत्यक्ष कृती झाली तरच हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील शिवभक्तांचा विजय असेल. अन्यथा, या घोषणा फक्त दिशाभूल करणाऱ्या राजकीय खेळी ठरतील.
म्हणून, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती करतो की त्यांनी तत्काळ मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरू करून महाराष्ट्रातील शिवभक्तांना योग्य न्याय द्यावा. महाराष्ट्रातील जनतेला केवळ शब्द नव्हे, तर कृती हवी आहे!
जय भवानी! जय शिवाजी!