राजधानी नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन विविध मुद्यांनी गाजत आहे. याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाजही स्थगित करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विविध मुद्द्यांवर भाषण करत काँग्रेस आणि गांधी परिवारावर टीका केली होती. यावर आता राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.
आज राज्यसभेत बोलताना विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन मुद्दे खोडून काढत, त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर मल्लिकार्जून खरगे यांचा १३ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याचबरोबर मोदी तीन वेळा खोटे बोलल्याचा आरोपही केला आहे.
नरेंद्र मोदींचा पहिला आरोप :
१९४७ ते १९५२ दरम्यान देशात निवडून आलेले सरकार नव्हते. या काळात संविधानात आणि बेकायदेशीर दुरुस्त्या केल्या जात होत्या.
मल्लिकार्जून खरगे यांचे उत्तर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात द्वेषाने इतके वाहून गेले आहेत की, त्यांनी संविधान सभा, अंतरिम सरकार आणि अंतरिम संसदेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे या सर्वांमध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांचाही सहभाग होता.
नरेंद्र मोदींचा दुसरा आरोप :
१९५१ मध्ये, निवडून आलेले सरकार नसताना नेहरूंनी अध्यादेश आणून संविधान बदलले.
खरगे यांचे उत्तर :
संविधानाची पहिली दुरुस्ती हंगामी संसदेने केली होती. हंगामी संसदेचे सदस्यच संविधान सभेचे सदस्य होते. यामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांचाही समावेश होता. मागास जातींना आरक्षण देता यावे आणि जमीनदारी रद्द करता यावी म्हणून ही दुरुस्ती करण्यात आली होती. कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मद्रास राज्याचा आरक्षणाचा निर्णय फेटाळून लावला होता. या दुरुस्तीमागे दुसरा उद्देश एससी-एसटी आणि ओबीसी प्रवर्गांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देणे हा होता.
एवढेच नाही तर ३ जुलै १९५० रोजी सरदार पटेल यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहून घटनादुरुस्ती हाच समस्येवर उपाय असल्याचे सांगितले होते. त्यांच्या भाषणात मोदींनी नेहरू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला, ज्यात वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे.
नरेंद्र मोदींचा तिसरा आरोप :
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जागी पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः पंतप्रधान झाले.
खरगे यांचे उत्तर :
१९४६ च्या कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत, काँग्रेसने नेहरूंना कार्यकारी परिषदेत उपाध्यक्ष केले होते, म्हणूनच त्यांनी १९४७ मध्ये अंतरिम सरकारचे नेतृत्व केले. १९५१-५२ मध्ये देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यानंतर नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हा सरदार पटेल या जगात नव्हते.
यापूर्वी १४ नोव्हेंबर १९५० रोजी नेहरूंच्या जयंतीनिमित्त लिहिलेल्या अभिनंदन पत्रात सरदार पटेल यांनी म्हटले होते की, “काही स्वार्थी लोकांनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि काही भोळे लोक त्यांच्यावर विश्वासही ठेवतात. पण प्रत्यक्षात आम्ही आयुष्यभर भावासारखे एकत्र काम करत आलो. प्रसंगावधान राखून आम्ही एकमेकांना मदत केली, जुळवून घेतले.”