‘काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत’, या शरद पवारांच्या विधानावर अंजली दमानियांनी टीका केली. इतकंच नाही, तर त्यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असाही सल्ला दिला. दमानियांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘शरद पवारांनी किती वेळा आणि कुणा कुणाचे राजीनामे मागितले होते, हे दमानियांना माहिती नाही.’
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर असो, सुरेश धस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो… बजरंग सोनावणे देखील, हे सगळेच्या सगळे लोक, हे त्यांच्याच (शरद पवार) तालमीत वाढले आहेत. ते कसे आहेत. काय आहेत? राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते.”
“त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत. आताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची परिस्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या लोकांना मोठं करण्यामध्ये तुमचाच हातभार किती होता, हे आत्मपरीक्षण देखील शरद पवारांनी करणे गरजेचं आहे”, अशी टीका अंजली दमानियांनी केली.
अंजली दमानियांच्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवारांच्या मनात काय होतं, ही प्रत्येक गोष्ट काय जनतेसमोर येईल, असं मला वाटत नाही. किती वेळा त्यांनी राजीनामे मागितले होते? आणि कुणा-कुणाचे मागितले होते. आणि मग नंतर अंतर्गत दबाव कसे निर्माण झाले, हे कदाचित अंजली दमानियांना माहिती नसेल, त्या कधी वैयक्तिक भेटल्या, तर मी त्यांना नक्कीच बोलेन..
शरद पवार काय म्हणालेले?
“काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत. राज्य सरकारने कोण आहे, याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेईल, वातावरण खराब करतो अशासंबंधी अत्यंत सक्त असे धोरण आखण्याची गरज आहे. बीडला पूर्वीच्या वैभवाचे दिवस परत कसे येतील, याची काळजी घ्यावी”, असे शरद पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलताना म्हणाले.