kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

Delhi Exit Polls: दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे नेमके अंदाज काय ?

दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो. मागच्या तीन निवडणुकींत दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय झाला होता. त्याआधी दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसचा मात्र निवडणुकीवर फारसा प्रभाव दिसला नसल्याचे एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून सध्या तरी दिसत आहे.

२०१३ साली ‘आप’पक्षाने दिल्लीत चांगली कामगिरी करत यश मिळवले होते. त्यानंतर २०१५ साली झालेल्या निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. २०२० सालीही आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला होता. केंद्रात सत्ता असूनही दोन वेळा दिल्लीत पराभव सहन करावा लागल्यानंतर यावेळी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली होती.

एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार भाजपाला अंदाजे सरासरी ४२ जागा वर्तविण्यात आल्या आहेत. तर आम आदमी पक्षाला अंदाजे सरासरी २५ जागा दाखविण्यात आल्या आहेत. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा आहेत. बहुमताचा आकडा ३६ असून बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजपाला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.