काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह इतर प्रमुख शहरांवर संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचा इशारा विविध माध्यमांतून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर विषय समोर आला आहे. सध्या राज्यभरात विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा सुरु आहेत, तसेच काही परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस प्रस्तावित आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या व परीक्षेच्या केंद्रावर कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुंबईचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी राज्याचे माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. श्री. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे अधिकृतरित्या ई-मेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या सर्व महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलाव्यात.
अॅड. मातेले यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणताही धोका पत्करणे उचित नाही. प्रशासनाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून लवकरच निर्णय घ्यावा, ही आमची मागणी आहे.”
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे.