शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भिड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मिनाक्षीताई पाटील यांचे संपूर्ण कुटुंबच शेतकरी कामगार पक्षाशी जोडले गेले आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे संस्कार झाले. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलने केली. त्यांचे जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होते. अलिबाग विधानसभेचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. सन १९९९ साली तत्कालिन विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून त्या कार्यरत होत्या. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या मिनाक्षीताईंच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटील कुटुंबियांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी असल्याचे अजितदादा पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.