Breaking News

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले. मला आजही तो शुभारंभ लॉन्सचा मेळावा आठवतो जिथे आपण रंगपंचमीला निवडणुकीचा गुलाल निकाला आधीच उधळला. शेवटी निसर्गाचा नियम आहे आपण समोरच्याला जे  देतो तेच आपल्याला परत मिळत तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात आता माझी वेळ आहे. माझ्याकडून हक्काने काम करून घ्या, अशा शब्दात  केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कलाकारांना आश्वासन दिले.

बालगंधर्व परिवार पुणे यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर कला दालन  येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते  बालगंधर्व परिवारातील ५०० कलाकार सभासदांना प्रत्येकी रुपये सात लाख अपघाती विमा तसेच कलाकारांच्या १० वी १२ वी पास  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी मोहोळ बोलत होते. याप्रसंगी बालगंधर्व परिवार पुणेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री प्रिया बेर्डे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर, बाबासाहेब पाटील, किशोर तरवडे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, इग्बाल दरबार, ऍड मंदार जोशी, राजेश कामठे, रमेश परदेशी,विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले,  बालगंधर्व आणि बालगंधर्व परिवार याच वेगळच नातं आहे याचा परिचय मला जेव्हा मी बालगंधर्वचा पुनर्विकास करायचं हातात घेतलं तेव्हा आला. कलाकारांसोबत काम करत असताना एक कुटुंबप्रमुख म्हणून त्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आणि आत्मीयता  ही मेघराजभैया यांच्यामध्ये मी जवळून अनुभवली आहे. कोविडच्या काळात तर सगळ्यात जास्त झळ ही सांस्कृतिक क्षेत्राला बसली त्यामुळे हातावर पोट असलेले कलाकार जगवण्यात त्यांचा मोठा हात होता. मी त्याचा साक्षीदार आहे. मराठी कलाकारांच्या एक विशेष आहे की, कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो वा  एखादी सामाजिक समस्या असो हे सर्वांच्या आधी मदतीसाठी पुढे असतात. अनेक संकटांच्या काळात ते आपल्याला दिसलेले आहे अशाच कलाकारांना आज मदतीचा हात देण्यासाठी आज बालगंधर्व परिवार पुढे आलेला आहे. ही कौतुकास्पद बातमी आहे. इथून पुढील काळात सांस्कृतिक धोरण असो किंवा केंद्रातील विविध सांस्कृतिक योजना असतील किंवा आणखीन काही मदतीचे विषय असतील; मी त्यात तुमच्या सोबत असेल, असा शब्द देखील दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मेघराज राजेभोसले म्हणाले, कलाकारांना दरवर्षी कोणत्या न् कोणत्या कारणांमुळे आव्हांनाचा सामना करावा लागतो. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कलाकारांसाठी भरीव तरतूद असलेल्या योजना आणल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी मोहोळ यांच्याकडे आहे, केंद्राच्या काही योजना आहे मात्र त्यांची माहिती राज्यातील कलाकारांपर्यंत पोहचत नाही यामुळे अशा योजनांची माहिती देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी, कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलावंत कल्याण मंडळाची स्थापना करावी, जेणेकरून नाट्य, सिनेमा, तमाशा, लोककला या सर्व प्रकारातील कलावंताची एक सूची तयार होईल, अनेकदा राज्य सरकार कडून सांगण्यात येते की नेमके किती कलाकार आहेत, याची कोणतीही नोंद नाही कलावंत कल्याण मंडळ झाले तर हा प्रश्न सुटेल तसेच यामुळे कलाकारांना एक मराठी कलाकार म्हणून राज्य सरकारची मान्यता सुद्धा मिळेल.  तसेच कलाकारांसाठी राज्य सरकारने कायमस्वरूपी आरोग्य विमा काढावा अशी मागणी राजेभोसले यांनी केली. तसेच राज्याचे, केंद्राचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी पुढाकार घ्यावा, तत्पूर्वी पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवावे असे आवाहन मोहोळ यांना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर आभार अनिल गुंजाळ यांनी मानले.