kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

ट्रम्प यांच्या ‘टेरिफ टेररिझम’मुळे जगात आर्थिक दहशतवाद वाढतोय – रामदेवबाबा

महिला पतंजली योग समितीतर्फे कोल्हापुरात आयोजित राज्यस्तरीय महिला महासंमेलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ट्रम्प यांच्यासह जगभरातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानवतेला कलंकित करणारे व्यक्तिमत्व आहे. जगभरातील नेत्यांना बोलावून ते त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यांच्या ‘टेरिफ टेररिझम’मुळे जगभरात आर्थिक दहशतवाद वाढतोय अशी टीका योगगुरु रामदेवबाबा यांनी शनिवारी केली.

राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थितीत ट्रम्प केव्हा काय निर्णय घेईल यावर जगभरात गोंधळ माजतो. ते एकीकडे बोलून दाखवत कृती करताहेत, मात्र शी जिनपिंग तर न बोलताच थेट कृती करत आहेत हे जास्त चिंताजनक आहे. पुतीन काही बोलत नाहीत, काही विधान करत नाहीत, ते थेट कारवाई करताहेत आणि किम जोंग काय करेल हे सांगताच येत नाही अशाप्रकारचे राजकीय दहशतवादाचे वातावरण जगभरात आहे, अशी टीका रामदेवबाबा यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, यामध्ये भारत एकमेव असा देश आहे, जो दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण कधी करत नाही. परंतु देशाला स्वयंशक्तीशाली बनणे गरजेचे झाले आहे. आत्मसन्मानाची लढाई देशाला स्वत:ला लढावी लागणार आहे.

ट्रम्पमुळे न्याय पायदळी तुडवला जात आहे. मानवतावाद आणि अध्यात्म याच्या जोरावर केवळ सशक्त भारतच तोडीस तोड उत्तर देउ शकेल. भारतीय भूमीत सन्मान आणि अधात्म्य यांची ताकद आहे. त्यासाठी देशवाशियांनी एकजूट करण्याची गरज आहे. इथली महिला शक्ती ईश्वराचा अंश आहे. तिच्या सन्मानासाठी पतंजलीने देशभर ५० लाख महिलांचे एकत्रिकरण करण्याचे ठरवले आहे. उपाय जे सांगणार नाहीत तेच खरे समस्या बनत आहेत. योगामुळे चांगला माणूस घडेल, ट्रम्पसारखा कलंकित आणि मानवतेला काळीमा फासणारा माणूस न बनवण्याचे आव्हान जगासमोर आहे, ते योगशक्तीमुळे साध्य होईल असे रामदेव बाबा म्हणाले.