शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा या अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव साईनाथ दुर्गे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, इंजिनिअरिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश देशमुख, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, प्रथमेश सकपाळ, मिलिंद झोरे उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या पदांसाठी दिनांक 9 फेब्रुवारी, 2025 रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र तलाठी व इतर पेपर फुटी झाली त्याच एजन्सीला हे काम दिले गेले आहे. या परीक्षा अधिकृत केंद्रांवर आणि निःपक्षपातीपणे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली.
तसेच या भेटीत दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोड येथील मुंबई महापालिकेची सीबीएसई शाळा व मुंबई पब्लिक स्कुलमधील शिक्षकांची रिक्त पदे आवश्यकतेनुसार तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी सचिव साईनाथ दुर्गे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली.
साईबाबा म्युनिसिपल शाळा, लालबाग या शाळेच्या उभारणीचे काम तातडीने सुरू करावे,अशी सूचना माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली.