पुण्यासाह राज्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. या आजारमुळे आता पर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्ण असून यातील काही जणांची स्थिती चिंताजनक आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्याने होत असल्याचं पुढं आहे. मात्र, या आजारासंदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीबीएस संदर्भात म्हटवाच विधान केलं आहे. हा आजार दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे होतं असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे. ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, असेही पवार म्हणाले. कोंबड्याचे मास घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेऊन खावे असे देखील पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, पुण्यात खडकवासला परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस (GBS) चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. येथील परिसरात दूषित पाण्यामुळे येथील नागरिक जीबीएसमुळे बाधित झाले असावे असे वाटले होते. मात्र या परिसरातील काहींचे म्हणणे आहे की, कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने हा आजार झाला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असून मी आता राजेंद्र भोसले यांना प्रेसनोट काढायला सांगणार आहे. तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. जीबीएस रुग्णांची संख्या दूषित पाण्यामुळे वाढत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र हा आजार अधिक वाढू नये, यासाठी नक्की काय केले पाहिजे, कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याबाबत मार्गदर्शन करणारी माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे पवार म्हणाले.
पुण्यात जीबीएस बंधितांची संख्या वाढत आहे. रविवारी तपासणी होत नसल्यामुळे बाधित रुग्णसंख्या कमी दिसत असून पुण्यात १२४ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शनिवारी नव्याने एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या २०८ वर पोहोचली आहे. त्यातील १८१ जणांना जीबीएस झाल्याचं निष्पन्न झालं आहे. जीबीएसचे रुग्ण ज्या भागात आढळले आहे, तेथील सर्वेक्षण सुरू आहे. तसेच या भागात शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.