दाऊदी बोहरा समाजातर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान येरवडा स्थित डेक्कन काॅलेज ग्राऊंड वर भव्य चौथे सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायांमधील लोकांना एकदुसऱ्यांशी कनेक्ट करून व्यावसायिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुर्तजा जसदानवाला यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, तीन दिवस आयोजित या एक्स्पोमध्ये एमएसएमईज, स्टार्टअप्स, वुमेन एन्टरप्रेन्योर, रिटेलर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर, एज्युकेशनल इन्स्टीट्यूट्स, हेल्थकेअर आणि वेलनेस प्रोफेशनल्स सह विविध क्षेत्रातील दाऊदी बोहरा समाजाचे उद्योजक आणि व्यावसायिकांचे जवळपास १७० स्टाॅल्स येथे असणार आहेत. एक्सपो मध्ये देश-विदेशातून येणाऱ्या दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांसह हजारो नागरिक यामध्ये सामिल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या एक्स्पोच्या माध्यमातून महिला आणि युवकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. तसेच महिलांना या माध्यमातून उद्योगक्षेत्रात आणण्यासाठी हा एक्सपो एक उत्तम मंच सिद्ध होईल. विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायासांना या माध्यमातून भव्य प्रमाणात ब्रँडिंग आणि मार्केटिंगची संधी हा एक्सपो देणार आहे. पुण्यासह मुंबई, नागपूर, छ. संभाजी नगर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक यासह संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातून उद्योजक व व्यावसायिक या एक्स्पोला भेट देण्यासाठी येणार आहेत. याशिवाय एक्स्पोला भेट देणाऱ्या लाखो नागरिकांना विविध वस्तू व सेवांची पुर्तता करणाऱ्या कंपन्यांची माहिती येथे उपलब्ध होणार आहे.
या एक्स्पोसाठी अनेक गणमान्य व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पुण्याचे खासदार तथा केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, महेंद्र पितालिया, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह उद्योग-व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील हजारो मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये नागरिकांनी लाखोंच्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन मुर्तजा जसदानवाला यांनी केले आहे.